माजी राष्ट्रपतींचे भाचे किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जळगाव / प्रतिनिधी :
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह त्यांच्या भावंडांच्या नावावरील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शिवारातील शेत जमिनीवर मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांनी बेकायदा कब्जा केला आहे. याप्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला आहे. न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाचे दोन बेलीफ प्रत्यक्ष त्या शेतजमिनीवर आले असताना त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना हुसकावून लावल्याचा आरोप वजा माहिती माजी राष्ट्रपतींचे भाचे किशोर दिलीपसिंग पाटील यांनी शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यासंदर्भात सविस्तर माहिती देतांना किशोर पाटील म्हणाले की, दोंडाईचा शिवारातील गट क्रमांक ३५१ ही आठ हेक्टर ३२ आर शेतजमीन आणि दोन हेक्टर २२ हजार शेतजमीन ही अरुणा पाटील, गजेंद्रसिंग पाटील, दिलीपसिंग पाटील, प्रतिभाताई शेखावत, प्रिया पाटील, रणजितसिंग पाटील, राहुल पाटील आणि विलाससिंग पाटील यांच्या नावावर आहे ह्या एकत्रित शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह त्यांच्या भावंडांची नावे आहेत. या शेतजमिनीचा उपयोग माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने सेवाभावी संस्था उभारून करण्याविषयी दोंडाईचा येथील रावल कुटुंबियांनी केली होती. उद्देश चांगला वाटला म्हणून पाटील कुटुंबियांनी २००६ मध्ये याविषयी तोंडी सहमती दर्शविली. मात्र, काही काळानंतर लक्षात आले की, रावल कुटुंबियांचा सेवाभावी संस्था उभारण्याचा हेतू स्पष्ट नाही.
दरम्यान, रावल कुटुंबियांच्या ताब्यात असलेली जमीन परत कब्जात मिळावी म्हणून सन २०१२ मध्ये धुळे महसूल न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले.त्यात सुनावणी होऊन निकाल पाटील कुटुंबियांच्या बाजूने लागला तर दोंडाईचा दिवाणी न्यायालयाचा निकाल ही २०२२ मध्ये पाटील कुटुंबियांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पझेशन घेण्याची प्रोसेस सुरू झाली. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने दोन बेलिफ प्रत्यक्ष ताबा हस्तांतरणासाठी शेतजमिनीवर गेले असता रावल यांच्या समर्थकांनी त्यांना अंमलबजावणी करून देण्यास मज्जाव केला. तसेच पाटील कुटुंबियांशी हुज्जत घालून हुसकावून लावले, असे किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.