वीज प्रभाग कार्यालयाचे हेमंत बेलसरे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
वीज मीटर बदलल्यावरही बिलाची तक्रार करुनही निराकरणात उशीर होत आहे. यासंदर्भात ग्राहकाच्या केलेल्या तक्रारीकडे वीज प्रभाग कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड ग्राहकाने वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्यामुळे वीज महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चौकशीची मागणी केली आहे.
शहरातील रायसोनी नगरातील रहिवासी हेमंत बेलसरे यांनी त्यांच्या घराच्या वीज मीटरबाबत गंभीर तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून वीज मीटर नादुरुस्त होते. त्यांनी अनेकवेळा अर्ज देऊन पाठपुरावा केला असला तरी वीज मीटर लवकर बदलून मिळाले नाही. एक ते दीड महिन्यापूर्वी वीज मीटर बदलून मिळाले. परंतु दोन महिने उलटूनही नवीन मीटर रीडिंग उपलब्ध नाही. परिणामी, त्यांना जास्त बिल आकारण्यात आले आहे. अशा तक्रारीसाठी त्यांनी प्रभाग १३ जवळील वीज कार्यालयात अर्ज सादर करून पाठपुरावा केला. परंतु अर्जावर सहीसह शिक्का देण्यास नकार देण्यात आला. अखेर, त्यांनी जळगाव डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये वीज कंपनीकडे तक्रार दाखल केली.
ग्राहकांचा न्याय सुनिश्चित करण्याचे आवाहन
त्यांच्या मागील जास्त आकारलेल्या बिलाची समायोजन करावी, जास्त कापलेले पैसे परत मिळवून द्यावेत. मात्र, वीज अभियंता प्रभाग १३ येथील विशाल नेमाडे यांनी अद्यापही त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिलेले नाही. बेलसरे यांनी या प्रकरणात संबंधितांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ग्राहकांचा न्याय सुनिश्चित करण्याचे आवाहनही त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केले आहे.