अमली पदार्थाविरोधी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अमली पदार्थांचे मानसिक दुष्परिणाम म्हणजे चिंता, डिप्रेशन, मानसिक तणाव, मतिभ्रम आणि स्मृतीभ्रंश होणे. शारीरिक दुष्परिणामांमध्ये वजन कमी होणे, झोप न लागणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या येणे यांचा समावेश होतो. त्यामुळे युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली अवलंबावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अवित पाटील यांनी केले.
राष्ट्रीय हरित सेना आणि दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात युवक-युवतींमध्ये वाढलेल्या व्यसनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व उपस्थितांनी अमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार व्यक्त केला.
अमली पदार्थामुळे शारीरिक व मानसिक आजार, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी, सामाजिक बदनामी, शिक्षण आणि करिअरवर परिणाम तसेच गुन्हेगारी व हिंसाचार अशा गोष्टी घडतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रा. वासुदेव पाटील, राष्ट्रीय हरित सेनाचे प्रमुख प्रवीण पाटील, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.