Sand And Gravel Extraction : वाळू, मुरुमाच्या उपश्यासह वाहतूक तात्काळ थांबवा

0
21

मनसेतर्फे पाच दिवसांचा अल्टिमेटम, तहसिलदारांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू आणि मुरुमाचा उपसा आणि वाहतूक तात्काळ थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शीतल राजपूत यांची भेट घेऊन निवेदन दिले. येत्या पाच दिवसाचा अल्टीमेटम देऊन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या जळगाव तालुक्यात गौण खनिजांचा, विशेषतः वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी यांसारख्या गावांमध्ये गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे. त्यामुळे नदीपात्रांची खोली वाढत आहे. हे पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे. सध्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळू माफियांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्यानंतर वाळू डंपरने शहरात आणून विकली जाते.

मनसेने आरोप केला आहे की, बेकायदेशीर व्यवसायात काही सरकारी अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी अप्रत्यक्ष मदत करत आहेत. त्यामुळे मनसेने सर्व बेकायदेशीर वाळू उपसक आणि त्यांना मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले तर मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

निवेदन देतेवेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

निवेदन देतेवेळी जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष प्रकाश जोशी, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ॲड.सागर शिंपी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्यासह सर्व महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here