मेहरुणमध्ये दोन आरोपी जाळ्यात ; सुरतचा वाँटेड आरोपीही पकडला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मेहरुण परिसरात मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत स्फटीक मेथ एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थासह दोन मोबाईल फोन जप्त केले आहे. मालाची किंमत सुमारे ८२ हजार रुपये आहे. दरम्यान, ही कारवाई शनिवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मेहरुण येथील जे.के. पार्क स्विमिंग पुलाजवळ एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पो.हवा. अक्रम शेख यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्यावेळी मेहमुद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यास रंगेहात पकडण्यात आले. चौकशीत त्याने हा अंमली पदार्थ अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक, मेहरुण) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.उपनि. चंद्रकांत धनके, पो.शि. योगेश घुगे करीत आहेत.
सुरत कनेक्शन उघड
कारवाईदरम्यानच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलिसांकडून वाँटेड असलेला नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यालाही ताब्यात घेतले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरत येथे १९८ ग्रॅम एम्फेटामाईन जप्त झाले होते. त्यात कुरेशी फरार होता. त्याला जळगाव पोलिसांनी सुरत सिटी क्राइम ब्रँचकडे सोपवले.
कारवाईत यांचा होता सहभाग
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स.पो.नि. गणेश वाघ, पो.उप.नि. शरद बागल, स.फौ. अतुल वंजारी, पो.हवा. अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, सलीम तडवी, पो.ना. किशोर पाटील, पो.शि. गोपाल पाटील, रवींद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, रवींद्र चौधरी, चा.पो.शि. महेश सोमवंशी यांचा समावेश होता.