पत्रकार परिषदेत भाजपाचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचा विश्वास
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारताच्या अमृतकाळात सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली जीएसटी ‘दरकपात’ ऐतिहासिक आणि सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब, व्यापारी आणि व्यावसायिकाला थेट दिलासा मिळणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला आ. सुरेश भोळे (राजूमामा), भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, राजेंद्र सोनवणे, जिल्हा पदाधिकारी अशोक राठी, दीपक परदेशी, आशिष सपकाळे, जीएसटी सहसयोजक चंद्रशेखर अग्रवाल, मनोज भांडारकर, अमित काळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जीएसटी दररचनेचे सुसूत्रीकरण करण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्या संकल्पाला आता प्रत्यक्ष रूप मिळाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळून व्यापार, रोजगार आणि उत्पादनाच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.नव्या कररचनेनुसार सध्याची चार स्तरांची कर आकारणी संपुष्टात येऊन फक्त १८ टक्के आणि ५ टक्के या दोनच स्तरांत कर आकारला जाणार आहे. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका होणार असून, सर्वसामान्यांपासून शेतकरी, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवा, मध्यमवर्गीय समाजघटक अशा सर्वांनाच या सुधारणेचा लाभ होणार आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या राजकारणासाठी मोदी सरकार कटिबद्ध
देशाचे आर्थिक धोरण २०१४ पूर्वी संथगतीने चालले होते. भ्रष्टाचार, महागाई, धोरण लकवा आणि क्लिष्ट करप्रणाली यामुळे विकासात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, मोदी सरकारने सातत्याने आर्थिक सुधारणांवर भर दिल्यामुळे आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देणे ही काँग्रेसची सवय झाली आहे. मात्र, मोदी सरकार सर्वसामान्यांचे भले करण्यासाठी आणि विकासाचे राजकारण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.