डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळेला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताहानिमित्त ‘औषध दक्षता–सामान्य चिकित्सकांमध्ये जागृती’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ४० चिकित्सकांनी सहभाग घेऊन औषध सुरक्षा जनजागृतीसाठी एकत्र संकल्प केला. कार्यशाळेतील सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यशाळेचा औषधांचे दुष्परिणाम ओळखणे, त्याची नोंद करणे व समाजात औषध सुरक्षा जनजागृती करणे मुख्य हेतू होता. कार्यशाळेत ‘महिलांमधील औषध सुरक्षिततेवर’ डॉ. माया आर्वीकर यांनी प्रकाश टाकला तर डॉ. चंद्रया कांते यांनी ‘परिणामकारकता व दुष्परिणाम’ ओळखण्याबाबत माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ. निलेश बेंडाळे यांनी ‘औषधांची सामाजिक सुरक्षितता’ अधोरेखित केली तर डॉ. अनंत बेंडाळे यांनी ‘लहान मुलांच्या लसीकरणातील औषधोपचार व दुष्परिणामांवर’ सविस्तर प्रबोधन केले.
कार्यशाळेला वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औषध दक्षता सप्ताहाचे डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. चंद्रया कांते, डॉ. बापूराव बिटे, नमिता उमेश यांनी आयोजन केले. प्रास्ताविकात डॉ. बापूराव बिटे यांनी औषध दक्षतेची संकल्पना, दुष्परिणामांचे प्रकार व नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. शेवटी त्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.