एक मित्र आणा, संस्कार पसरवा : युवकांसाठी संस्कारांची अनोखी पर्वणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील टीव्ही टॉवर शेजारील उभारलेले भव्य, नक्षीकामयुक्त आणि सांस्कृतिक-धार्मिक वारशाचे दर्शन घडवणारे श्री स्वामिनारायण मंदिर केवळ उपासना आणि आराधनेचे केंद्र नाही तर भारतीय सनातन धर्माच्या परंपरा, संस्कार आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. अशा मंदिरात नियमितपणे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत “ब्रिंग अ फ्रेंड्स” विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
महाविद्यालयीन युवक-युवतींना भारतीय संस्कृतीची, सनातन धर्माच्या महान परंपरेची आणि स्वामिनारायण संप्रदायाच्या शाश्वत संदेशाची ओळख करून देणे, असा उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. मंदिराने स्पष्ट केले आहे की, युवकांनी केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या मित्रांना, सहाध्यायांना घेऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, कारण संस्कारांची वाटचाल एकत्र केली तर ती अधिक प्रभावी ठरते.
मंदिरातील प्रत्येक नक्षीकाम आणि शिल्प एक कथा सांगते. भारतीय इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे शिल्पकला अवलोकन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रमात शिल्पांचे सविस्तर प्रतिपादन, धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे विवेचन आणि मंदिरातील विविध विभागांची ओळख करून देण्यात येणार आहे. “ब्रिंग अ फ्रेंड्स” कार्यक्रमात केवळ दर्शनापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची, प्रश्न विचारण्याची आणि विचारमंथनाची संधीही दिली जाणार आहे. धर्म, संस्कार व इतिहास अशा त्रिसूत्रीचा संगम युवकांना अनुभवता येणार आहे.त्यांच्या वैचारिक व आध्यात्मिक प्रगतीला त्याचा हातभार लागेल.
प.पू.नयन स्वामींचे प्रेरणादायी आवाहन
आजच्या धावपळीच्या जीवनात युवकांनी थोडा वेळ देवालयासाठी, संस्कारांसाठी आणि धर्मासाठी द्यावा. केवळ स्वतःच नाही तर मित्रपरिवारासह मंदिरात येऊन उपक्रमाचा लाभ घ्यावा. एक मित्र आणा, दहा मित्रांपर्यंत संस्कारांचा सुवास पोहोचवा. भारतीय संस्कृतीचे महत्त्व युवकांनी जाणले तर समाज अधिक सशक्त बनेल, असे आवाहन प.पू. नयन स्वामी यांनी युवकांना केले आहे.
पालकांसह समाजाचा प्रतिसाद अपेक्षित
अशा उपक्रमामुळे युवकांमध्ये धर्माबद्दल श्रद्धा, संस्कृतीबद्दल अभिमान आणि संस्कारांविषयी निष्ठा जागृत होईल, असा विश्वास मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. जळगाव शहरासह परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अशा अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.