शिरसोलीत शोककळा ; न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा परिवाराचा पवित्रा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
“सासरचा जाच आणि गर्भपातासाठीचा दबाव” अशा सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रज्ञा चेतन शेळके (वय २२, रा. करजई, ता. चाळीसगाव, ह.मु. शिरसोली) ह्या पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या करुन ‘जीवन’ संपविल्याची घटना गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. अशा घटनेमुळे हळहळ व्यक्त होऊन शिरसोलीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, गर्भपातासाठी होणारा दबाव आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या १ एप्रिल २०२४ रोजी प्रज्ञाचा चाळीसगाव तालुक्यातील चेतन शेळके यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. मात्र, काही काळापूर्वी प्रज्ञा काही कारणास्तव शिरसोली येथे माहेरी परत आली होती. अशातच घरातील सदस्य शेतात गेले होते. तेव्हा घरात कुणी नसल्याचे पाहून प्रज्ञाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या करुन ‘जीवन’ संपविल्याचा टोकाचा निर्णय घेतला.
प्रज्ञाचे वडील भागवत धामणे गुरुवारी दुपारी शेतातून परतले. तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर त्यांना प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत बेशुध्द अवस्थेत आढळली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील सेवेवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञाचा सासरकडून सतत मानसिक छळ केला जात होता. विशेषत: गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला जात होता. अशा दबावामुळेच तिने आपले ‘जीवन’ संपविल्याचा गंभीर आरोप तिच्या परिवाराने केला आहे.
गावात तणाव अन् परिवाराचा आक्रोश
प्रज्ञाच्या परिवाराने सासरच्या मंडळींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “न्याय मिळाल्याशिवाय तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही,” असा ठाम पवित्रा परिवाराने घेतल्याने गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच घटनेनंतर गावातील वातावरण गंभीर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. परिवाराची अपेक्षा आहे की, घटनास्थळी आणि सासरकऱ्यांच्या वागणुकीची सखोल चौकशी करून त्यातून योग्य कायदेशीर परिणाम काढण्यात यावा. याप्रकरणी अधिक तपास आणि शवविच्छेदनाच्या प्रक्रियेसाठी पुढील कारवाई केली जात असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
समाजानेही सजगता बाळगण्याची गरज
पारिवारिक व सामाजिक दबावातून वर्तणूक बदलली जाणे आणि महिलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे अशा प्रकारच्या वाईट परिणामांना मार्ग मोकळा होतो, असे घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह नंतरचे नातेसंबंधीयांमधून मत व्यक्त होत आहे. स्थानिक महिला संघटनांसह ग्रामस्थांनी अशा घटनेवर दु:ख व्यक्त करत त्वरित सामाजिक संरक्षण आणि मानसिक आरोग्य सेवांचा प्रसार याबाबतीत अधिक समाजानेही सजगता बाळगावी, अशी अपेक्षा सूज्ञांमधून व्यक्त होत आहे.
