विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रमाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
भारतीय विमानोत्तन प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळ प्रशासनाने बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी ‘यात्री सेवा दिवस’ जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. ‘यात्री सेवा दिवस’ जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
विमानतळ परिसरात यानिमित्त विद्यार्थ्यांचे लोकनृत्य, चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होत विमानतळ पाहण्याचा आनंदही लुटला. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विमानतळ सफरला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांचे स्वागत टिळा लावून करण्यात आले. त्याचवेळी विमानतळावरील सोयी-सुविधांविषयी प्रवाशांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. प्रवाशांनीही अशा उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वैद्यकीय मोफत तपासणी आणि रक्तदान शिबिरालाही प्रतिसाद मिळाला.
