बीसीसीआयच्या पॅनलमध्ये निवडीबद्दल संदीप गांगुर्डेंचा गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंचांची दोन दिवसीय कार्यशाळा जळगाव येथील जैन हिल्सवरील सुबीर बोस सभागृहात नुकतीच पार पडली. कार्यशाळेत जळगावसह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील ४५ पंच सहभागी झाले होते. बदललेल्या नियमांसह विविध क्रिकेट नियमांची सविस्तर चर्चेसह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व पंचांची ५० गुणांची सराव चाचणी (रिव्हिजन टेस्ट) घेण्यात आली. उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले.
कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून अजय देशपांडे (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी जळगावचे पंच संदीप गांगुर्डे यांची बीसीसीआय पंच पॅनलमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वरुण देशपांडे, मुश्ताक अली यांचा महाराष्ट्र क्रिकेट पंच पॅनलमध्ये समावेश झाल्याबद्दल गौरव झाला. गेल्यावर्षी उत्तीर्ण झालेल्या पंचांना प्रमाणपत्राचे वितरणही झाले. यावेळी निवृत्त होणारे नाशिकचे पंच व्हॅलेन्टाईन मार्कंडो यांचाही शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंसह पंचातील दरी कमी करण्याचे आवाहन
कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी पंचांना संवाद साधत खेळाडू व पंच यांच्यातील दरी कमी करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अजय देशपांडे यांनी आभार मानले. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि जळगाव जिल्ह्याचे पहिले अधिकृत पंच यांनी मनोगत व्यक्त करताना पंचांनी निर्णय क्षणाचाही विलंब न करता तटस्थपणे व ठामपणे द्यावेत, कारण एक निर्णय फलंदाजाचे भविष्य ठरवतो, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
