विद्यार्थ्यांच्या सहभागाने उजळला ‘हिंदीचा’ गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी गीत, कवितांसह मनोगतांनी ‘हिंदी दिन’ रंगला. हा दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागाने ‘हिंदीचा’ गौरव उजळला होता. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, हिंदी भाषा समितीचे सर्व शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजनासह माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देणारी मनोगते व कवितांचे सादरीकरण केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीने कविता सादर केली तर गिरीशने मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक के. व्ही. पाटील यांनी हिंदी दिनाचे महत्त्व उलगडले तर अलका पितृभक्त यांनी हिंदी गीत सादर केले.
मुख्याध्यापक निकम यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा अभिमान बाळगण्यासह तिच्या संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी हिंदी समिती प्रमुख संगीता पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन दहावीतील गिरीजाने तर आभार नंदिनीने मानले.



