New Concepts Like ‘Zen Ji’: ‘झेन जी’सारख्या नवनवीन संकल्पनांनी घडेल भविष्याचा विद्यार्थी

0
16

‘केसीई’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांचे प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

‘झेन जी’सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील विद्यार्थी घडणार असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांनी केले. गेल्या आठ दशकांहून अधिक काळ खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने शिक्षण क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत गुणवत्तापूर्ण आणि आत्मनिर्भर पिढी घडवली आहे. अशा परंपरेला पुढे नेत संस्थेचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा मनभावन संकुलातील कान्ह कला मंदिर येथे मंगळवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अशोक राणे, डॉ. हर्षवर्धन जावळे, भालचंद्र पाटील, संजय प्रभुदेसाई, शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात ॲड. प्रकाश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत गेल्या पाच वर्षांत आयएमआर, इंजिनिअरिंग कॉलेज, मुलांचे वसतिगृह, लॉ कॉलेज व ५०० आसन क्षमतेचे नाट्यगृह अशा सुविधा उभारल्याचे नमूद केले. कार्यक्रमात संस्थेच्या १६ शाखांनी आपापल्या वाटचालीची माहिती सादर केली. तसेच संस्थेचा गौरवशाली इतिहास दर्शवणारी चित्रफीत सादर केली. कान्ह ललित केंद्राने सप्तकलांचा बहारदार अविष्कार सादर करून सोहळ्याला रंगत आणली.

प्रास्ताविकात प्रा. मृणालिनी फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी २०२०) अन्वये केसीई सोसायटी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस), संगीत, योगशास्त्र आणि निसर्गोपचार अशा शाखांमध्ये पदवी ते डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

विविध सादरीकरणातून शाखांचा परिचय

सोहळ्यात सोहम योगा सेंटर, एकलव्य क्रीडा संकुल, एस.एस. मणियार लॉ कॉलेज, किलबिल बालक मंदिर, जी.पी.व्ही.पी. शाळा, ए.टी. झांबरे माध्यमिक शाळा, ओरीओन सीबीएसई व स्टेट इंग्लिश मिडियम स्कूल, एम.जे. कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, आयएमआर, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन, अध्यापक कॉलेज, ओजस्विनी कला महाविद्यालय यांनी विविध सादरीकरणातून आपल्या शाखांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर, मुख्याध्यापक प्रणिता झांबरे तर आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here