साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या इच्छादेवी चौकात मंगळवारी पहाटेच भीषण अपघात घडला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ओमनी कारच्या जोरदार धडकेत ७० वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळच्या शांततेत घडली दुर्घटना
खंडेराव नगर परिसरात राहणारे वसंत प्रताप पाटील (वय ७०) हे रोजप्रमाणे सायकलवरून जात असताना सकाळी सव्वा सहा वाजता इच्छादेवी चौकात पोहोचले. तेवढ्यात समोरून नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने धावणाऱ्या ओमनी कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की पाटील रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. हनिफा मोमीन यांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पोलिसांचा तपास सुरू
या अपघाताची नोंद जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अपघातातील ओमनी कार अद्याप अज्ञात असून, पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. परिसरातील नागरिकांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.