विवाहितेला शॉक देवून ठार केल्याचा आरोप, सहा महिन्यांपासून पोलिसांकडून कारवाईचा अभाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पारोळा तालुक्यातील टिटवी येथील विवाहिता कविता राजू सोनवणे हिचा सासरच्या लोकांनी सतत शारीरिक आणि मानसिक छळ करून अखेर शॉक देवून जीवे ठार मारल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही कारवाई केलेली नसल्याने मृत विवाहितेच्या परिवाराने सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे परिवाराने स्पष्ट केले आहे.
मृत कविता सोनवणेच्या आई आणि भावाने सांगितले की, कविताला तिचा पती आणि सासरचे लोक सतत त्रास देत होते. शारीरिक आणि मानसिक छळामुळे ती दीर्घकाळ तणावाखाली होती. अखेर सासरच्या लोकांनी तिला शॉक देवून ठार मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. अशा गंभीर गुन्ह्याबाबत त्यांनी वारंवार पोलिसांना माहिती दिली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
पोलिसांच्या उदासीन भूमिकेमुळे धक्का
पोलिसांच्या उदासीन भूमिकेमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार : कुटुंबीय
अशा घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सासरच्या लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन लढ्याबरोबरच समाजातील महिला संघटनांनी अशा प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचा सूर स्थानिकांमधून उमटत आहे.