१३ वर्षाखालील गटात सुवर्णपदकाची ‘कमाई’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
चंद्रपूर येथे स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा गेल्या १० ते १४ सप्टेंबरदरम्यान पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेत चाळीसगाव (जळगाव) येथील ओवी पाटील आणि कराडची श्रद्धा इंगळे यांनी १३ वर्षाखालील मुलींच्या दुहेरी गटात राज्य विजेतेपद पटकावले आहे.
सेमीफायनलमध्ये त्यांनी मुंबई उपनगरच्या हेजल जोशी, स्पृहा जोशी यांना २१-१५, २१-१४ अशा सरळ सेट्समध्ये हरवित अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मुंबईच्या मायरा गोराडिया, कनक जलानी यांचा २१-१४, २१-१५ असा पराभव करून सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख पारितोषिक व प्राविण्य प्रमाणपत्र मिळवले. ओवीचे वडील तथा प्रशिक्षक अमोल पाटील (चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेचे क्रीडा शिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी पराक्रम साध्य झाला.
यशाबद्दल विजेत्यांचे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, प्रशिक्षक किशोर सिंह यांनी कौतुक केले. दरम्यान, जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक दीपिका ठाकूर यांच्यासह महिला खेळाडूंनी ओवीचा सत्कार करून स्वागत केले.
