भावनिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता; मान्यवरांची लाभली उपस्थिती
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
वारकरी भूषण सहकार महर्षी संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगरचे माजी अध्यक्ष स्व. भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या २१व्या पुण्यतिथीनिमित्त संत मुक्ताई जुने मंदिर, श्री क्षेत्र कोथळी येथे आयोजित पंचदिनी निळोबाराय गाथा पारायण व नामसंकीर्तन सोहळा ७ ते ११ सप्टेंबर २०२५ दरम्यान भक्तिभावात पार पडला. गाथा पारायणाचे व्यासपीठ ह.भ.प. संदीपन महाराज खामणीकर यांनी सजवले होते. ११ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी दिनी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचदिनी सोहळ्याची भक्तिरसात सांगता झाली. यावर्षीपासून स्व. भाऊसाहेबांच्या स्मरणार्थ संत मुक्ताबाई संस्थानच्यावतीने सुरु केलेल्या “आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार २०२५” पुरस्काराने दुर्गाताई संतोष मराठे यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार अंतर्गत त्यांना मानपत्र, ११ हजार रुपये रोख रक्कम व संत मुक्ताईंचे मानाचे महावस्त्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुक्ताईनगर येथील पत्रकारांचा शाल, श्रीफळ, ब्रह्मचित्कला संत मुक्ताई गाथा ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
सोहळ्यास ॲड. रवींद्र पाटील (अध्यक्ष, संत मुक्ताबाई संस्थान), जयंतराव महल्ले, डॉ. एस.आर. पाटील, वसंत पंढरी पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी स्व. भाऊसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देताना भावनावश होऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या भावना पाहून उपस्थित भाविकांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. संपूर्ण कार्यक्रमात किर्तनकार, कथावाचक, टाळकरी, माळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि हजारो भाविक वारकरी सहभागी झाले होते.
पुरस्कारामुळे कार्याला मिळाली नवी ऊर्जा
माझ्या कार्याची दखल घेऊन असा सन्मान मिळणे, ही माझ्यासाठी संत मुक्ताईची कृपा आहे. पुरस्काराच्या माध्यमातून माझ्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. स्व. भाऊसाहेब हे केवळ एक सहकारी नेते नव्हते, तर समाजप्रबोधन करणारे एक खरे संत होते. त्यांच्या पुण्यस्मरण दिनी हा गौरव मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. संत मुक्ताई संस्थान, अण्णासाहेब महल्ले व संपूर्ण समितीचे पुरस्कारार्थी दुर्गाताई मराठे यांनी आभार मानले आहेत.



