‘Dedication, Service And Resolution’ : ‘समर्पण, सेवा अन्‌ संकल्प’ त्रिसूत्रीवर आधारित कार्यशाळा परिवर्तनशील नेतृत्व घडविणार

0
17

धरती आबा अभियानाअंतर्गत ‘आदि कर्मयोगी’ कार्यशाळेला प्रतिसाद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील आदिवासी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रम’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते मंगळवारी, ९ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ही कार्यशाळा ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. कार्यशाळेचा उद्देश ‘समर्पण, सेवा आणि संकल्प’ अशा त्रिसूत्रीवर आधारित परिवर्तनशील नेतृत्व घडवणे असणार आहे.

देशभरात २० लाख परिवर्तनशील नेते घडविण्याचे मोठे उद्दिष्ट अभियानामार्फत समोर ठेवण्यात आले आहे. “आपला गाव समृद्धीचे स्वप्न” संकल्पनेवर आधारित उपक्रमातून गावपातळीवर नवदृष्टीची पेरणी करून सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात आला. कार्यशाळेत गाव विकास आराखड्याचे नियोजन, विभागीय समन्वय आणि गतिमान प्रशासनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी तहसील, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, वनविभाग आदी विविध खात्यांचे तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित केली होती.

कार्यशाळेत टीआरटीआय पुणे येथून श्री. फिरके हे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी तीन दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी बीएमटी अधिकाऱ्यांना गावपातळीवर नेतृत्व निर्माण, संकल्पबद्ध सेवा, विभागीय सहभाग, समन्वय आणि गतिमान प्रशासन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. अभियानात जळगाव जिल्ह्यातील ११२ गावांचा समावेश आहे. त्यांना विकास आराखड्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स गावपातळीवर कार्यशाळा आयोजित करून किमान २० आदि सहयोगी व आदिसाथींच्या सहभागातून ग्रामविकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देतील. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात जाऊन शिवार फेरी काढून एकाच दिवशी ग्राम विकास आराखडा तयार करतील. आराखड्यांना येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत मंजुरी देण्यात येणार आहे.

सर्व विभागांचा एकत्रित सहभाग अन्‌ समन्वयाची आवश्यकता

कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ‘आदि कर्मयोगी होणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया’ असल्याचे सांगितले. त्याच प्रक्रियेमधून तळागाळात नेतृत्व निर्माण होऊन ग्रामस्थांच्या सहभागातून एक आदर्श ग्रामविकास आराखडा तयार होऊ शकतो, असे ते म्हणाले. यासाठी सर्व विभागांचा एकत्रित सहभाग आणि समन्वयाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

आदिवासी समाजात दीर्घकालीन परिवर्तन घडविण्याची आशा

कार्यशाळेत जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स प्रशांत माहुरे, डॉ. प्रमोद पांढरे, अभिनव माळी, श्री.बावीस्कर, अरुण साळुंखे, महेश पाटील, ज्ञानेश्वर कुमावत, रोहन महाजन, तुषार पाटील आणि धर्मराज पाटील यांनी सहभाग घेत प्रशिक्षण दिले. उपक्रमातून गावाच्या विकासाला दिशा मिळून आदिवासी समाजात दीर्घकालीन परिवर्तन घडविण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रास्ताविक तथा संचालनाची जबाबदारी प्रशांत माहुरे, अजित जमादार यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here