Hemant Kalunkhe’s Shocking ‘Exit’ : जळगावातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांची चटका लावणारी ‘एक्झिट’

0
8

बातमीचा व्यापक विचार करण्याचा दृष्टीकोन राहील सदैव स्मरणात…!

ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांचे असे अचानक निधन होईल, असा विचारही कुणाच्या मनात कधी येणे शक्य नव्हते.

देवाजीच्या आले मना । 
तेथे कुणाची चालेना ।।

असेच मृत्यूचेही आहे. त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे…, सहकार्याचे…, आदराचे… संबंध होते. त्यांनी पत्रकारितेत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला तर होताच वैयक्तिक पातळीवरही माणसे जोडून ठेवणाऱ्या अशा ‘अवलिया’ने जणू वेचून-वेचून माणसं कमावली होती, हे त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे गमक होते. जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दै. ‘साईमत’चे वरिष्ठ उपसंपादक (मानद), जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, शहरातील पत्रकार कॉलनीतील (खेडी परिसर) रहिवाशी हेमंत शंकरराव काळुंखे यांचे गेल्या बुधवारी, ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ७३ वर्ष होते. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित जनसमुदाय आणि शोकाकूल मान्यवरांनी व्यक्त केलेली आदरांजली त्यांच्या कर्तृत्वाची आणि सर्वसमावेशकतेने व्यापलेल्या त्यांच्या जगण्याची ‘पावती’ देणारी ठरली.

पत्रकारितेच्या कारकिर्दीला त्यांनी दै. ‘जनशक्ती’पासून प्रारंभ केला होता. जळगावात ‘गावकरी’, ‘लोकशाही’ अशा दैनिकांमध्येही त्यांची धडाकेबाज पत्रकारिता गाजली होती. गेल्या २००७ पासून ते दै. ‘साईमत’ परिवाराशी जोडले गेले होते. दैनिकातील विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव असला तरी प्रामुख्याने मनोरंजन, नाटक, सिनेमा, गायन, वादन हे त्यांचे आवडीचे विषय होते. सध्याच्या काळातील आधुनिक सुविधांच्या तुलनेत संसाधनसंपन्नता नसलेल्या जुन्या पिढीतील पत्रकारितेत त्यांनी केलेले जिल्ह्यातील सहकार आणि शिक्षण क्षेत्राला दिशा दाखवणारे वृत्तांकन, विश्लेषण गाजले होते. मनमिळावू स्वभाव, सतत कार्यमग्नता व गरजूंना मदत करणारी त्यांची वृत्ती अशा विविधांगी स्वभाववैशिष्ट्यांमुळे ते समाजातील विविध घटकांमधल्या दांडग्या जनसंपर्काचेही धनी ठरले होते.

जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयात २००२ मध्ये मी पत्रकारिता क्षेत्रातील पदवीचे (बीसीजे) शिक्षण घेत असतांना त्यांच्याशी माझा संपर्क आला. पत्रकारितेचे शिक्षण घेतांना दैनिकात १०० तासांची इंटर्नशिप (प्रशिक्षण) करावी लागते. कॉलेजतर्फे इंटर्नशिपसाठी मिळालेले पत्र घेऊन मी जळगावातील दै. ‘देशोन्नती’च्या कार्यालयात पोहोचलो. ते पत्र त्यावेळचे संपादक हेमंत काळुंखे यांची भेट घेऊन त्यांना दिले. त्यांनी मला रोज दोन तास कार्यालयात येऊन बातम्या लिहिण्याचा सराव करावा, असे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला कार्यालयातील उपसंपादकांसोबत बीटवर जाण्याची सवयही त्यांनी लावली. बातम्यांचे लिखाण, बातम्या कशा मिळवाव्या आणि इतर प्रशिक्षण दिल्यामुळे मला पत्रकारितेचे ज्ञान अवगत झाले. त्यांच्या सहवासात त्यांनी दिलेला बातमीचा व्यापक विचार करण्याचा दृष्टीकोन सदैव स्मरणात राहीलच.

दोन महिने दै. ‘देशोन्नती’त इंटर्नशिप त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्यावर मला पत्रकारिता समजण्यास मदत झाली. नंतर पत्रकारितेचे शिक्षण झाल्यावरही बहुतांश कार्यक्रम, शासकीय कार्यालयांमध्येही काळुंखे सरांची भेट होत होती. भेटीत ते नेहमी आस्थेवाईकपणे सध्या कोणत्या दैनिकाचे काम करतात…?, कामात काही अडचणी जाणवतात का…?, बातमीला द्यावा लागणार ‘ह्युमन टच’ कसा आकलनात आणावा…?, असे सगळे अगदी चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यासारखे माझे कान धरून मला हक्काने समजावत होते. तसेच इतर माहितीही ते जाणून घेत होते. त्यांचा करारी आवाज आणि सुस्पष्ट बोलीभाषा आजही आठवते. ती स्मरणातही आहे. कालांतराने मी जामनेरला स्थानिक पातळीवर पत्रकारितेत रमल्यावर स्वत:चे साप्ताहिकही चालविले. त्यानंतर २०१५ पासून घरगुती कारणास्तव जळगावात आल्यावर उपसंपादक म्हणून दैनिकांमध्ये रुजू झालो होतो. त्यात दै. ‘जळगाव माझा’, ‘तरुण भारत’, ‘जनशक्ती’ चा समावेश होता. दरम्यान विविध कार्यक्रम, पत्रकारांचे मेळावे असो अथवा इतर सामाजिक कार्यक्रम, बीट त्यातही योगायोगाने त्यांची भेट होत होती. त्यानंतर सायंदैनिक ‘साईमत’चे रुपांतर दैनिकात झाल्यावर दै.‘साईमत’मध्ये मला उपसंपादक पदाची संधी मिळाली होती. दै. ‘साईमत’चे वरिष्ठ उपसंपादक (मानद) म्हणून हेमंत काळुंखे काम पाहत होते. पुन्हा त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. याठिकाणीही मला काम करतांना त्यांनी पत्रकारितेचे बाळकडू पाजले. विविध विषयांवरील बातम्या, लेख, छायाचित्रे, नाट्य समीक्षण, इतर विषयांवर मार्गदर्शन केले.

‘पत्रकारिता’ हीच त्यांची अखेरची ओळख ठरली…!

चार महिन्यांपूर्वी त्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते. काही दिवस त्यांनी ऑपरेशनमुळे घरीच विश्रांती घेतली. मात्र, त्यांच्यातली पत्रकारिता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी परिवाराच्या परवानगीनंतर ऑफिसला हजर राहून काम सुरु केले होते. काळ्या चष्म्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केल्यावर ते संगणकावर स्वत: बातम्या संपादित करण्याचे काम करीत होते. घरी विश्रांतीचा सल्ला सगळेच देत असले तरी त्यांना ते मान्य नव्हते. शेवटी पत्रकारिता हीच त्यांची अखेरची ओळखही ठरली, असेच म्हणावे लागेल.

… अन्‌ वाढदिवसाच्या ‘सेलिब्रेशन’चा नेहमी हक्काने आग्रह

श्री. काळुंखे यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. मात्र, कार्यालयासह घरीही साजरा होणारा वाढदिवसाचा आनंद हिरावला गेला होता. यंदाचा श्रावण महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरीच होते. तेव्हापासून ते कार्यालयात कामावर आले नव्हते. ते गेले आणि सर्वांना कायमचे पोरके करुन गेले. माझ्यासह कार्यालयातील सर्व सहकारी त्यांची प्रकृती बरी होऊन ते आज नाही तर उद्या परततील, यासाठी गेल्या १० दिवसांपासून आम्ही सर्व त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र, त्यांचे जाणे मन हेलावणारे ठरले. कार्यालयातील त्यांची नेहमीची साधी ‘खुर्ची’ त्यांच्या उणिवेची जाणीव करुन देत होती. कार्यालयातील कोणत्याही सहकाऱ्यांचा अथवा ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, व्यवस्थापकीय संचालक परेश बऱ्हाटे, व्यवस्थापक सुनील अहिरे यांचे वाढदिवस असल्यावर ते नेहमी हक्काने सेलिब्रेशनचा आग्रह करत होते. ही त्यांची आठवणही कायम स्मरणात राहील.

‘चिठ्ठी ना कोई संदेश… कहाँ तुम चले गये…’

जळगाव शहरात राज्य नाट्य स्पर्धांचे प्रामुख्याने आयोजन असल्यास ते कार्यालयातील काम आटोपून सायंकाळी नाट्य परीक्षणासाठी स्पर्धास्थळी पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न राहत होता. नाटक संपल्यावर दुसऱ्या दिवशी ते नाट्य समीक्षण टाईप करुन दैनिकात प्रकाशित करत होते. त्यामुळे त्यांचा नाट्याविषयीचा असणारा उत्साह अतिशय जवळून पाहता आला. नाट्य, चित्रपट, पत्रकारिता असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो त्यांना त्यात रुची होती. त्यांनी चित्रपट क्षेत्रातील विविध कलाकारांविषयी ‘के. हेमंत’ म्हणून ते बायोग्राफी प्रकाशित करत असल्याचीही माहिती त्यांनी मला एकवेळा चर्चेवेळी दिली होती. त्याकाळात त्यांनी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांच्यासोबत काढलेले छायाचित्र आजही त्यांच्या परिवाराने संग्रहित करुन ठेवली आहे. त्यावरुनही त्यांचा कलाकारांशी असलेला संबंध लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक त्यांच्या आठवणी सदैव कायम राहतील. हिंदी चित्रपट ‘दुश्मन’मधील एका गाण्याची आठवण झाली. ते असे ‘चिठ्ठी ना कोई संदेश… कहाँ तुम चले गये…’ असेच गाणे म्हण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे. काळुंखे सरांच्या परिवाराला हे दु:ख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो, हेमंत काळुंखे सरांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करुन दै. ‘साईमत’ परिवाराच्यावतीने त्यांना आदरांजली वाहतो…!

– शरद भालेराव
उपसंपादक,
दै. ‘साईमत’, जळगाव.
मो.क्र.८८३०४१७७३६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here