दहा शाळेच्या ४ हजार विद्यार्थ्यांसह पालकांशी साधला थेट संवाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्लायमेट वीक इंडियाच्यानिमित्त आयोजित ‘अन्न साक्षरता यात्रा’ ही तीन दिवसांची मोहीम गेल्या ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जळगावात उत्साहात पार पडली. यात्रेद्वारे दहा शाळांमधील सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांसह पालकांशी थेट संवाद साधण्यात आला. यात्रेचे उद्घाटन भैय्यासाहेब गंधे सभागृहात बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा यांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रात शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवादात्मक उपक्रम घेण्यात आले.
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी लेबल वाचनात उत्साहाने सहभाग घेतला. दुपारी जळगाव आकाशवाणी येथे विशेष मुलाखत घेण्यात आली. त्याच दिवशी ‘आपण फाउंडेशन’मध्ये पालकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा झाली. त्यात मुलांच्या आहाराच्या सवयींवर चर्चा झाली. पालकांनी मुलांना आरोग्यदायी अन्न देण्याचा संकल्प केला. १० सप्टेंबर रोजी सकाळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल येथे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फूड डेमो पाहून अनुभव घेतला. त्यानंतर के. के. इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी गटांमध्ये विभागून आरोग्यदायी व जंक फूडची तुलना करुन त्यावर सादरीकरणे केली. दुपारी हरिजन कन्या छात्रालयातील निवासी विद्यार्थिनींशी संवाद झाला. त्यात मुलींनी अनुभव व्यक्त केले. तसेच आरोग्यदायी अन्न खाण्याचा निर्धार व्यक्त केला.
यात्रेत सिमरन परमार (सहसंस्थापक, क्लोज माय लुप तथा योगीचे कोअर सदस्य) आणि गिरीष पाटील (संस्थापक व सीईओ, योगी तथा युनिसेफ युवाह सदस्य, राष्ट्रीय युवा सल्लागार) यांनी मार्गदर्शन केले. सिमरन मोहिमेसाठी मुंबईहून जळगावला आली होती. सत्रांमध्ये दोघांनीही मुलांना अन्न, आरोग्य आणि पर्यावरण यांतील दुवा उलगडून दाखवला. ‘सुदृढ आहार, निरोगी भविष्य’ या घोषवाक्याने संपूर्ण यात्रा पूर्ण झाली.
यात्रेत यांचा होता सहभाग
येत्या वर्षभर “जळगाव क्लायमेट वॉरियर” अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. यात्रेत सहभागी झालेल्या शाळांसह विविध संस्थामध्ये शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय, रोझ लॅंड इंग्लिश मीडियम स्कुल, आयडियल इंग्लिश मीडियम स्कुल, एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कुल, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल, के. के. इंटरनॅशनल स्कुल, हरिजन कन्या छत्रालय, आपण फाउंडेशन यांचा समावेश होता.