एम.जे. महाविद्यालयातील बायोकॅमिस्ट्री विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या बायोकॅमिस्ट्री विभागात गुणवंत पदवीपूर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते उपस्थित होते. कार्यक्रमाला बायोकॅमिस्ट्री विभागातील ६४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची प्रेरणा आणि गुणवत्तेची जाणीव अधिक बळकट होण्यास मदत झाली.
दरवर्षी बायोकॅमिस्ट्री विभाग हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा आणि आगामी विद्यार्थ्यांसाठी एक दर्जात्मक पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच परंपरेनुसार यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारांसाठी बिलवाडीतील एस.पी. ॲग्रो केअरने आर्थिक सहकार्य केले. त्यात प्रथम हर्षा कुरकुरे, द्वितीय नेहा वानखेडे, तृतीय सत्यजीत डोंगरदिवे यासोबतच अक्षय काकडे यांचाही विशेष सत्कार केला.
दोघांनी मिळून समुद्रातील लाल शेवाळपासून सेंद्रिय व पर्यावरणपूरक जैव-प्लास्टिक तयार केले आहे. त्यांनी अशा शोधासाठी पेटंटही दाखल केले आहे. हे जैव-प्लास्टिक संपूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविलेले आहे. त्याला उत्तम तन्य शक्ती, लवचिकता आहे. १६० दिवसात ओलसर मातीत पूर्णपणे विघटित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजन विभाग प्रमुख डॉ. भूषण कविमंडन तसेच प्रा.डॉ. सुरेश कांबळे, डॉ. किशोर पाटील आणि डॉ. विपुल फालक यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाचे आयोजन तथा सूत्रसंचालन डॉ. उमेश वाघ यांनी केले.