पत्नी घरी परतण्यासाठी तरुण करतोय जीवाचे ‘रान’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
वैतागून माहेरी निघून गेलेली पत्नी पुन्हा परत यावी, यासाठी पोलिसांची मदत घेण्या साठी गेलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेण्याची घटना जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनसमोर घडली. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या अंगातील शर्टाने पेटत्या तरुणाचे प्राण वाचविले आहेत. मात्र, जळगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयात जळीत जखमी तरुणावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जळीत तरुणाचे सुनील ममराज वाघ तर तरुणाचा जीव वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे योगेश माळी असे नाव आहे.
सविस्तर असे की, रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समता नगर भागातील सुनील वाघ या तरुणाची पत्नी घरगुती वादाला वैतागून माहेरी निघून गेली होती. तिने परत यावे, यासाठी त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. मात्र, त्याची पत्नी परत येण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्याने गेल्या ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या मामीसोबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला पत्नीची तक्रार करण्यासाठी आला होता. सोबत त्याने मोटार सायकलच्या डिक्कीत पेट्रोलही सोबत आणले होते. सुनील पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा असतांना त्याची मामी या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्याच कालावधीत त्याला त्याच्या पत्नीचा पलीकडून फोन आला. तो तिला घरी येण्यासाठी सांगत होता. पलीकडून तिचे बोलणे ऐकून इकडे सुनीलची मन:स्थिती बिघडत होती. फोनवर शब्दामागे शब्द वाढत असतांनाच त्याने संतापाच्या भरात वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढली. पेट्रोल अंगावर ओतून त्याने स्वत:ला पेटवून घेतले.
पोलीस कर्मचाऱ्याच्या सजगता अन् तत्परतेचे कौतुक
या प्रकाराची माहिती पोलीस स्टेशनमध्ये समजताच पोलीस कर्मचारी योगेश माळी धावून आले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता जळणाऱ्या सुनीलचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चा शर्ट काढला. शर्टाच्या मदतीने त्यांनी जळत असलेल्या सुनीलच्या अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारीही पुढील मदतीला धावून आले. जखमी सुनीलला तातडीने शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत तो मात्र पोलीस कर्मचाऱ्यामुळे बचावला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या सजगता आणि तत्परतेमुळे योगेश माळी यांचे कौतुक होत आहे.



