Burglary In Ayodhya Nagar : जळगावातील अयोध्या नगरात घरफोडी : साडे तीन लाखांच्या ऐवजावर चाेरट्यांचा डल्ला

0
4

घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी साधली संधी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यातंर्गंत येणाऱ्या अयोध्या नगरात घरफोडीची घटना घडली आहे. स्वामी दर्शन अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार ७५० रुपयांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आरती कृष्णा शिंपी (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या परिवारासह गेल्या २७ ऑगस्ट रोजी मुंबई आणि सुरत येथे गेल्या होत्या. त्या १० दिवसानंतर, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी सकाळी परत आल्या. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडेच असताना, चोरट्यांनी त्यातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारला. त्यात आरती शिंपी यांच्यासह त्यांच्या मैत्रिण बेबाबाई खोडपे यांचेही काही दागिने होते.

पोलिसांकडून पाहणी करून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे यांनी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here