एम.जे.कॉलेजमधील आयोजित व्याख्यानात डॉ.नितीन विसपुते यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणाऱ्या मानसिक ताणाचे कारण, परिणाम आणि प्रतिबंधावर सखोल आणि अनुभवसिद्ध मार्गदर्शन करुन श्वसन तंत्र, ध्यान धारणा, वेळेचे नियोजन, शारीरिक व्यायाम तसेच सकारात्मक विचारसरणी यासारख्या विविध ताणमुक्तीच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. तसेच भावनिक समज, आत्मपरीक्षण आणि दैनंदिन जीवनात समतोल राखणे यांचे महत्त्व अधोरेखित करुन आपला समज बदलल्यावर आपले जग बदलते, असे प्रतिपादन जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांनी केले.
मूळजी जेठा महाविद्यालयातील बायोकॅमिस्ट्री विभागातर्फे पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी “ताण तणाव व्यवस्थापन” विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस होत्या.
उपक्रमाला बायोकॅमिस्ट्री विभागातील ६४ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम अतिशय संवादात्मक आणि प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांनी डॉ. नितीन विसपुते यांच्याशी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधत आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले. शेवटी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा उपयोग करून मानसिक ताण कमी करण्याचा आणि अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यांचे लाभले सहकार्य
यशस्वीतेसाठी बायोकॅमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. भूषण कविमंडन तसेच विभागातील प्रा.डॉ. सुरेश कांबळे, डॉ. किशोर पाटील, डॉ. विपुल फालक यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम त्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमेश वाघ तर बायोकॅमिस्ट्री विभागाने आभार मानले.