Girna River, ‘Ganesh’ Drowned : गिरणा नदीत विसर्जनावेळी ‘गणेश’ बुडाला ; तपास कार्य सुरु

0
6

पाळधी-तरसोद बाह्यवळण बायपासजवळ घडली घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २७ वर्षीय ‘गणेश’ नावाचाच युवक गिरणा नदीवर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती. बेपत्ता झालेल्या युवकाचे गणेश गंगाराम कोळी (वय २७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) असे नाव आहे.

गणेश हा आई-वडील आणि बहिणीसह पाळधी-तरसोद बाह्यवळण महामार्गावरील नव्याने उभारलेल्या पुलाखाली घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेला होता. मूर्तीसह नदीत उतरल्यावर तो अचानक पाण्यात खोलवर गेल्यावर बुडू लागला. परिवाराने आरडाओरड केली मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणालाच त्याला वर काढता येणे शक्य झाले नव्हते.

पाण्याच्या विसर्गामुळे शोध कार्यात अडथळे

घटनेची माहिती मिळताच ममुराबाद गावातील नातेवाईकांसह मित्र मदतीला धावून आले. तसेच तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे शोध कार्यात अडथळे आले. रविवारी, ७ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीत सुमारे ९ हजार ७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आव्हाणे, वडनगरी, फुपनगरी, कानळदा परिसरातील गावांमध्ये शोध सुरू ठेवण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here