शिक्षक दिनानिमित्त शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रुपचंद (आर.आर.) विद्यालयाचे स्काऊटचे शिक्षक गिरीष रमणलाल भावसार यांचा शिक्षक दिनानिमित्त माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने शिक्षक दिनानिनिमित्त शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यासाठी शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, संचालक सुभाष देशमुख, सरस्वती विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, ला. ना. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका राजकमल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या २९ वर्षांपासून जळगावातील रावसाहेब रुपचंद विद्यालयात गिरीष भावसार कार्यरत आहेत. ते भूगोल व मराठी विषयाचे अध्यापक आहेत. शाळेतील महात्मा गांधी स्काऊट पथक प्रमुख म्हणून ते काम पाहतात. राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त १२ विद्यार्थी, राज्य पुरस्कार प्राप्त २४ स्काऊट, पंतप्रधान ढाल स्पर्धा प्रथम क्रमांक, जिल्हा कारागृहात प्रौढ साक्षरता वर्ग स्काऊटच्या तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय मेळाव्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शनही करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विपश्यना शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व शाळेतील विविध कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
जनगणना, निवडणूक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे निवडणूक आयोग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पर्यावरण शिक्षण, नवीन अभ्यासक्रम यासह शिक्षकांसाठी आयोजित विविध प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. यापूर्वीही अनेक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
