शिवसेना शिंदे गटात असंख्य महिलांचा प्रवेश
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट महिला आघाडीचा भव्य निर्धार मेळावा व प्रवेश सोहळा भडगाव रस्त्यावरील प्रसाद हॉलमध्ये शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी जल्लोषात पार पडला. यावेळी जिल्हा प्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील, नगराध्यक्षा सुनिता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, युवा नेते सुमित पाटील उपस्थित होते. मेळाव्यात अनेक महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाचा झेंडा हाती घेताच घोषणाबाजीसह टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशामुळे महिला आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आगामी निवडणुकीसाठी संघटनेत नवा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचा सहभाग वाढणे हे काळाचे मोठे आव्हान आहे. महिलांनी निर्धाराने कामाला लागल्यास संघटना अजून बळकट होईल. शिंदे गट सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, लघुउद्योग आदी क्षेत्रात महिलांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रमुख मार्गदर्शक आ.किशोर पाटील यांनी सांगितले. महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आघाडी घेण्याचे सुनिता पाटील यांनी आवाहन केले. महिला आघाडी ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. समाजकारणातही पुढाकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकासाठी महिलांनी दाखवली सज्जता मेळाव्यानिमित्त ठिकठिकाणी भगवे झेंडे, बॅनर व फलकांनी परिसर सजविण्यात आला होता. शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे वातावरण घोषणाबाजीने दणाणून गेले होते.मेळाव्याद्वारे पाचोरा शहरातील महिला आघाडीने आगामी निवडणुकीसाठी आपली सज्जता दाखवून दिली आहे.
महिलांच्या सहभागामुळे शिंदे गटाच्या संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र समोर आले. मेळाव्यात किशोर बारावरकर, बंडू सोनार, शितल सोनार यांच्यासह नगरसेवक सतिश चेडे, सुमित सावंत आदींचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले.