गावात ८० च्यावर दारुचे अड्डे ; घरपोच मिळतेय सेवा
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
शहरापासून अवघ्या काही अंतरावरील तालुक्यातील साकेगाव जलजीवन मिशन योजनेसह अवैध धंदेच्या बाबतीतही नेहमीच चर्चेत असतो. गावात तब्बल ८० पेक्षा अधिक दारूचे अड्डे आहेत. सट्टा, पत्ता खुले काम चालतो. आता तर अवैध धंदेवाल्यांची इतकी हिम्मत वाढली की, अगदी एका फोन कॉलवर पाहिजे तिथे ‘तळीरामांसाठी’ दारू उपलब्ध करून दिली जाते. अगदी घरपोच सेवा. गावात उघड्यावर दारू पार्टीची फॅशन झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत चिमुकले ज्ञानदानाचे धडे गिरवतात, त्याच अंगणवाडीच्या पायऱ्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. दारू पार्टी केली जाते. तेही मुख्य रस्त्यावर हे विशेष.
गावातील बस स्थानक मार्गाकडे प्रवेश करताच दारूच्या अड्ड्यांना सुरुवात होऊन जाते. गावात जिल्हा परिषद शाळेच्या मार्गावरही असंख्य दारूचे अड्डे आहेत. इतकेच नव्हे तर मटन मार्केटच्या बाजूला जागेवरही अतिक्रमण करून दारूचे अड्डे चालविले जात आहे. याबाबत तरुणांमध्ये संतापाची भावना आहे. गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. दारूमुळे अनेकांच्या संसाराच्या राख रांगोळ्या झाल्या आहेत.अंगणवाडीच्या पायऱ्यावर दारूच्या बाटल्या
अंगणवाडीच्या पायऱ्यावर दररोज दारूच्या बाटल्या आढळून येतात.तक्रार करावी तरी कुठे…? त्याची दखल घेणार तरी कोण…? असा प्रश्न आता अंगणवाडी सेविकांना पडला आहे. हाच प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात होतो. शाळा बंद झाली की, रात्रीच्या वेळेस येथेही दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या स्वतः हाताने उचलून फेकाव्या लागतात, ही शोकांतिका आहे.
अवैध धंदे खुलेआम सुरू
एकीकडे प्रशासन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, यासाठी विविध योजना आणतात. मात्र, दुसरीकडे शालेय परिसरात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. त्यावर कोणीही हरकत घेत नाही. दरम्यान, गावाच्या सोशल मीडियावरही अवैध धंद्याबाबत मोठ्या प्रमाणात तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकही राजकीय पुढारी अवैध धंद्याला विरोध करत नाही. ग्रामसभेत ठराव करून कायमस्वरूपी दारू बंद करत नाही. त्यामुळे राजकीय पुढाऱ्याबाबतही गावात नाराजी सोबतच संशयही व्यक्त केला जात आहे.