Mahavitaran’s ‘Electric Safety Campaign’ : महावितरणच्या ‘विद्युत सुरक्षा अभियानाची’ जागतिक दखल

0
3

इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिक स्तरावर नोंद घेत इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे मार्गदर्शक आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनाही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह महावितरणच्यावतीने संचालक राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल (लंडन), प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका), ज्येष्ठ संपादक तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराच्या निवड समितीकडून महावितरणच्या विद्युत सुरक्षेच्या लोकाभिमुख अभियानाचे कौतुक करण्यात आले. त्यात वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष हेनरी आर (युरोप), प्रमुख श्री. पाब्लो (इंग्लंड), उपाध्यक्ष संजय पंजवानी, परीक्षक चंद्रशेखर शिंदे यांचा समावेश आहे.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानातील विक्रमी लोकसहभागाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आल्याबाबत अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छोटेखानी बैठकीत कौतुक केले. शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट महावितरणच्या कामाचा दैनंदिन भाग आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांद्वारे सातत्याने लोकसंवाद साधून विद्युत सुरक्षेची माहिती देत रहावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यांची होती उपस्थिती

यावेळी संचालक राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मंगेश कोहाट यांची उपस्थिती होती. तसेच युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेपाळ आणि भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांसाठी महावितरणला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थांनी नुकतेच गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here