जामनेरच्या चव्हाण दाम्पत्याने रामदेव बाबा समाधीस्थळी राबविला उपक्रम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील आनंद नगर येथील रहिवासी देविदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या दाम्पत्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच स्व.त्र्यंबक झामसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ राजस्थानातील रामपूर ते रामदेवरा जैसलमेर देवदर्शन यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना ट्रकभर पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे निःशुल्क वाटप करून भाविकांची तहान भागवली.
जामनेर तालुक्यातून व महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोच्या संख्येने रामदेव बाबांचे भक्त राजस्थान येथील रामदेवरा जैसलमेर येथे बाबांच्या समाधीस्थळी जात असतात. तेथे उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी चवीने खारट लागत असल्याने जामनेरच्या उभयतांनी भाविकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्रातूनच ट्रकभर पिण्याचे पाणी बॉटल आपल्या सोबत घेऊन त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना आपल्या परिवारासह निःशुल्क वाटप करून जामनेरचे नाव राजस्थान राज्यात पोहचवून एक आदर्श प्रस्थापित केला.
त्यांच्या या कार्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी सुद्धा या दाम्पत्यांनी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना स्वखर्चाने राजस्थानातील रामदेवरा जैसलमेर याच ठिकाणी बाबा रामदेव यांच्या समाधीचे दर्शन घडवून आणले होते. अशा अनेक धार्मिक कार्यात देविदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या नेहमीच अग्रेसर राहत असतात. त्यांच्या या कार्याचे तालुकाभरात कौतुक होतांना दिसून येत आहे.