असोदातील सार्वजनिक विद्यालयात बैलपोळा उत्साहात साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला बैलपोळा सण प्रत्यक्ष कृतीद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयातील यश पाटील, वैभव येवले यांनी त्यांचे बैल छान सजवून शाळेत आणले. देवयानी कोळी, ललिता कोळी, सारिका चौधरी, देवयानी कोळी, भाग्यश्री कोळी, श्रद्धा निकम या विद्यार्थिनींनी बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. तसेच गावातील शेतकरी जनार्दन चौधरी बैलांसोबत उपस्थित राहिले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण तायडे यांनी उपस्थिती दिली. त्यांनी आपल्या वक्तव्यातून बैलांविषयीचा आणि शेतकऱ्यांविषयी आदर व्यक्त केला. तसेच देवयानी कोळी हिने बैलपोळा सणाविषयी माहिती सांगितली. ‘आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी’ ह्या गीतावर डिंपल नारखेडे, तिच्या मैत्रिणी यांनी नृत्य सादर करून बळीराजाचे कौतुक केले.
श्रम आणि कष्टाचे बैल प्रतिक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला, सोबतीला असणारा बैल शेतकऱ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असतो, असे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक लालसिंग पाटील, मंगला नारखेडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले.