तीन दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा लाभला उत्स्फूर्त सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र आणि ओजस्विनी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला मातीचे गणपती बनवू या’ अशा तीन दिवसीय शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी १०८ मातीच्या ‘गणरायाच्या’ मूर्त्या कल्पकरित्या साकारल्या.
तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू मातीपासून गणपती तयार करताना, गणपती स्थापनेच्या शास्त्रीय पद्धतींच्या आधारावर गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक शिल्पकार दिगंबर शिरसाळे, पियुष बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना दिले. गणपतीची बैठक व्यवस्था, शरीर यष्टी, सोंडेचा आकार, मुकुट आणि आयुध आदींबाबतीत विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारण्याचा संकल्प
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना विद्यार्थी स्वतःच्या घरी करणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारण्याचा संकल्प विद्यार्थी पूर्ण करणार आहेत. केसीई सोसायटीच्या शिक्षण संचालिका मृणालिनी फडणवीस, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी पुरुषोत्तम घाटोळ, राजेंद्र सरोदे, कुणाल जाधव, भूषण बाविस्कर तसेच ललित कला विभागाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.