बेंडाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाजातील विविध अंगांचे दर्शन बहिणाबाईंच्या काव्यातून घडते. ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावरं’ ह्या त्यांच्या कवितेतून मनाची चंचलता बहिणाबाईंनी अचूकपणे टिपली. ‘मनाचे’ शास्त्र जणू उलगडून सांगितले. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईडच्या रांगेत त्या जाऊन बसल्या, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याकाळी त्यांच्या गाण्यांचा इंग्रजीत अनुवाद झाला असता तर बहिणाबाईंना नक्कीच साहित्याचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला असता. इतक्या उंचीचे त्यांचे साहित्य असल्याचे प्रतिपादन बेंडाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांनी केले. येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) मराठी विभागाच्यावतीने खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त पूर्वदिनी आयोजित ‘बहिणाईंची गाणी मराठी भाषेचा ठेवा’ कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे व्यक्तित्व व साहित्य’ विषयावर भाष्य करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रा. कल्पना खेडकर, प्रा. सुधाकर ठाकूर, प्रा. राजेश कोष्टी होते. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाईंच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादनाने झाली. त्यानंतर संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी ‘माझी माय सरसोती, ‘अरे संसार संसार’, ‘अरे खोप्यामधी खोपा’ अश्या एकाहून एक सरस काव्य रचना सादर करून विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले.
बहिणाबाईंनी काव्यातून घडविले लोकसंस्कृतीचे दर्शन
बहिणाबाईंनी संसार, गावगाडा, कृषी संस्कृती, सण-उत्सव व लोकसंस्कृतीचे दर्शन काव्यातून घडविले. बहिणाबाईंच्या गाण्याचा गोडवा गोड आवाजात श्रीमती परदेशी यांनी सादर केला. कार्यक्रमाचा समारोप प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी गायिलेल्या ‘घरोटं’ काव्यरचनेने झाला. सूत्रसंचालन प्रा.दीपक पवार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.