मोरीजवळील दुकानांचा रस्ता मोकळा करावा
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
येथील बेलव्हाळ चौफुलीवर असलेल्या मोरीच्या ठिकाणी खोदून ठेवलेले मातीचे ढिगारे रस्त्याच्या ठेकेदाराने दुकानासमोर लावल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून रस्त्यावरील मातीचा ढिगारा फेकण्यात यावा, अशी मागणी होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून सुनसगाव-गोजोरा रस्त्याचे काम सुरू आहे.
या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण होत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावर सुनसगाव नजीक बेलव्हाळ चौफुलीवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. याच ठिकाणी मोरीचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या मोरीच्या कामातून निघालेली माती याठिकाणी असलेल्या दुकानांसमोर टाकण्यात आली असून दुकानांकडे येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने दुकानदारांनी संबंधीत ठेकेदाराला याबाबत सांगूनही माती फेकली जात नाही. त्यामुळे या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे सुनसगाव-बेलव्हाळ चौफुलीवरील मोरी जवळील माती लवकरात लवकर फेकूण दुकानांचा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आनंदा लोहार, कैलास लोहार, भोला कोळसे, सुनिल पाटील यांनी केली आहे.