जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांचे नागरिकांना आवाहन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. तसेच पारेषण काळ असल्याने आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातही कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले. तसेच डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
मोहिमेतंर्गंत आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन डासअळी सर्वेक्षण करण्यात येत आहे. दूषित कंटेनर खाली करून डबकी, तलाव, तळे याठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून साठलेल्या पाण्यामध्ये क्रूड ऑईल टाकण्यासह गावातील गटारी वाहत्या करण्याच्या व कीटकनाशक पावडर फवारण्याबाबत सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, साथरोग अधिकारी बाळासाहेब वाबळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी आणि वाडी या गावांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्यासह भेटी देऊन सर्वेक्षण कामकाजाची पाहणी केली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक गावात आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज माळी, तालुका मलेरिया पर्यवेक्षक अण्णा जाधव, आरोग्य सहाय्यक प्रमोद चऱ्हाटे, आरोग्य सेवक जितेंद्र पाटील, योगेश देवरे, आशा स्वयंसेविका पल्लवी सोनवणे, कल्पना वराडे, मनिषा कापसे, वर्षा पाटील, शैला चौधरी आदी उपस्थित होते.