माऊली नगर परिसरात चिमुकल्याचा तोडला ‘लचका’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील माऊली नगर परिसरात मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एका पाच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करुन ‘लचका’ तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
आरएमएस कॉलेजजवळील माऊली नगरातील रहिवासी रवींद्र सुनील पाटील हे आपल्या पत्नी आणि पाच वर्षीय मुलगा समर्थ रवींद्र पाटील यांच्यासोबत राहतात. समर्थ हा १९ ऑगस्ट रोजी शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी १२ वाजता घरासमोरील अंगणात सायकल चालवत खेळत होता. त्याचवेळी अचानक एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने समर्थच्या मानेवर जबर लचका तोडला. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
महानगरपालिकाचे सातत्याने दुर्लक्ष
हल्ला होताच, समर्थचे वडील रवींद्र पाटील आणि आई दीपाली पाटील यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील समर्थला उचलून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या समर्थवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माऊली नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे असे जीवघेणे हल्ले वारंवार होत असतानाही याकडे महानगरपालिका सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा संताप नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.