प्रतिभा शिंदेंनी असंख्य अनुयायांसह ‘राष्ट्रवादीत’ प्रवेश केल्याने रा.काँ.ची ताकद निश्चितपणे वाढणार
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि रा.काँ.चे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या रविवारी, १७ ऑगस्ट रोजीच्या जळगाव दौऱ्याचे फलित काय…? असा जर राजकीयदृष्ट्या मुद्दा उपस्थित होत असेल तर त्याचे उत्तर एवढेच देता येईल की, त्यांच्या दौऱ्याने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात ‘नवी उमेद’ जागविली आहे. राजकीयदृष्ट्या अधिकाधिक प्रबळ होण्यासाठी हा दौरा उपयोगी पडू शकतो, असे राजकीय निरीक्षकांमध्ये मानले जात आहे. विशेषत: खान्देशमधील आदिवासी जनतेच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करुन आपल्या असंख्य अनुयायांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.
प्रतिभा शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री सतीष पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती प्रतिभा शिंदेंच्या प्रवेशाचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे. बहुजन समाजाच्या मोठ्या घटकांसह आता तमाम आदिवासी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी राजकीय शक्ती ठरु शकेल.
उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन राजकीयदृष्ट्या ठरणार दूरगामी परिणाम करणारे
पक्ष प्रवेश सोळ्यात खुद्द अजितदादा पवार यांनी आदिवासींच्या वन्य जमीनीच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांवर जे भाष्य केले आहे किंवा जे आश्वासन दिले ते राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारे ठरेल, असेही राजकीय निरीक्षकांना वाटते. हा पक्ष महायुतीत जरी असला तरी या पक्षाचा इतर दोन मित्र पक्षांच्या तुलनेत राजकीय प्रभाव तुलनेने काही प्रमाणात कमी होता, पण आता यापुढे राष्ट्रवादी आपले प्रभावक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, असे म्हणण्यास बाब आहे.