Shanbag School : शानबाग विद्यालयाने आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत पटकावला ‘फिरता चषक’

0
18

स्पर्धेत आठवी ते दहावीच्या वर्गातील ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे विशेष आयोजन केले होते. स्पर्धेत जळगाव शहरातील २५ शाळांमधून इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकावत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषकासह सन्मानचिन्हावर नाव कोरले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते भारतीय परंपरेनुसार शंखनाद व अग्नी प्रज्वलित करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मू.जे.स्वायत्त महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.केतन नारखेडे होते. यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा.अर्जुन मेटे, स्पर्धा समन्वयक डॉ. अतुल इंगळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश पंचरत्न स्तोत्र, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, लिंगाष्टकम स्तोत्राचे तालासुरात लयबद्ध पद्धतीने सादरीकरण केले. प्रास्ताविक प्रा.अर्जुन मेटे, सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केसीईचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, प्रशासकीय अधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेचे परीक्षण प्रा.अमिता निकम, प्रा.मयुरी हरीमकर, प्रा.मंगेश वाघ, प्रा.प्रीती शुक्ल, आर.जे.शुभांगी बडगुजर, सिद्धी उपासनी यांनी केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश सूर्यवंशी तर आभार स्पर्धा समन्वयक डॉ.अतुल इंगळे यांनी मानले. निकाल वाचन प्रा.छाया चौधरी यांनी केले.

असा आहे स्पर्धेचा निकाल

सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक व सन्मानचिन्ह ब.गो.शानबाग विद्यालय यांनी पटकावला. इयत्ता आठवीसाठी गणेश पंचरत्नस्तोत्र पठण स्पर्धेत प्रथम ब.गो.शानबाग माध्यमिक विद्यालय, द्वितीय न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय ओरियन सीबीएसई स्कूल, उत्तेजनार्थ प्रथम विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तेजनार्थ द्वितीय (विभागून) ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, श्रीमती एस.एल.चौधरी माध्यमिक विद्यालय, सर्व शाळा जळगाव.

इयत्ता नववीसाठी महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण स्पर्धेत प्रथम अ.वा.अत्रे विद्यालय, द्वितीय (विभागून) एस.एल. चौधरी माध्यमिक विद्यालय, ब. गो. शानबाग विद्यालय, तृतीय (विभागून) ओरियन सीबीएसई स्कूल, ला.ना. सार्वजनिक विद्यालय, उत्तेजनार्थ प्रथम (विभागून) ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, बालविश्व विद्यालय, उत्तेजनार्थ द्वितीय ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय, सर्व शाळा जळगाव.

इयत्ता दहावीसाठी लिंगाष्टकम स्तोत्र पठण स्पर्धेत प्रथम विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय (विभागून) ओरियन सीबीएसई स्कूल, ब.गो.शानबाग माध्यमिक विद्यालय, तृतीय नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, उत्तेजनार्थ प्रथम (विभागून) पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अ.वा.अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तेजनार्थ द्वितीय न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, सर्व शाळा जळगाव यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here