३० लाखांहून अधिक ‘व्ह्यूजचा’ टप्पा पार
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने ऑनलाईन सेवेच्या माध्मातून नागरिकांना प्रशासनाशी जोडण्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लेट फॉर्मने कालपर्यंत ३० लाखांहून अधिक ‘व्ह्यूजचा’ टप्पा पार केला आहे. अशा ऑनलाईन सेवांमुळे जळगाव जिल्ह्याची डिजिटल होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ‘सुलभ प्रणाली’ने सेवांच्या बाबतीत क्रांतीकारक बदल घडवून आणण्यात यश संपादन केल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.
अलीकडच्या काळात सुरु झालेल्या ऑनलाईन सेवेने नागरिकांनाही आकर्षित केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने काम करण्याचा हा परिणाम म्हणता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑनलाईन संदर्भात सुरु केलेल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅट फॉर्मस्ने ३० लाखांहून अधिक ‘व्ह्यूजचा’ टप्पा पार करुन एक आशादायी चित्र निर्माण केले आहे. केवळ एवढेच नव्हे तर विविध वेब प्लॅटफार्मद्वारे आतापर्यंत ५० लाखांहून अधिक नागरिकांनी पोहोच साधली आहे, हे देखील विशेष होय.
जनतेचा विश्वास अन् सहकार्यामुळे गाठली यशाची उंची…!
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध ८७ प्रकारच्या सेवा ऑनलाईन केल्या आहे. ‘सुलभ प्रणाली’द्वारे नागरिक डिजिटल माध्यमातून प्रशासनाशी जोडले जात आहे. सर्वच प्रकारच्या शासकीय सोयी, सुविधा तसेच जळगाव संवाद सेवा नागरिक आणि प्रशासनाला जोडणारा दुवा ठरला आहे. पारदर्शक प्रशासनासाठी अद्ययावत, अचूक आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे हेच आमचे ध्येय आहे, जनतेचा विश्वास आणि सहकार्यामुळे ही यशाची उंची आम्हाला गाठता आली असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.
