श्रीराम चौकातील विसावे परिवाराने मानले सर्पमित्राचे आभार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
साप पाहिल्यावर भल्या भल्यांची ‘भंबेरी’ उडते. मात्र, सापाला जीवंत पकडून त्याला सुरक्षित जंगलात सोडण्याचे कार्य सर्पमित्र करतात. अशातच जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील श्रीराम चौकातील एका घरात विषारी नाग जातीचा साप आढळला होता. त्याठिकाणी शहरातील सर्पमित्राने पकडून त्याला सुरक्षितस्थळी जंगलात सोडले आहे. याबद्दल परिवाराने सर्पमित्राचे आभार व्यक्त केले आहेत.
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर भागातील व्यकंटेश नगरातील रहिवासी तथा सर्पमित्र राजेश सोनवणे यांना रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘दादा, आमच्या घरात साप शिरला आहे, तुम्ही लवकर या…’ असा भ्रमणध्वनीवरुन निरोप मिळाला होता. तेव्हा ते विनाविलंब कोल्हे हिल्स परिसरातील श्रीराम चौकातील ज्ञानेश्वर विसावे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या घरातील हॉलच्या दरवाजाच्या पाठीमागे नाग जातीचा भला मोठा साप अक्षरश: फणा काढून बसला होता. अशावेळी सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी त्यांच्या घरी पोहचून नाग जातीच्या सापाला सुरक्षितरित्या पकडले. घरातील सर्व परिवाराची मनातली भीती काढली. त्यानंतर परिवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेथील लोकांना मार्गदर्शन करून सापाविषयी असणाऱ्या भीतीसह गैरसमज दूर केले. पकडलेला विषारी नाग जातीचा साप सुरक्षितरित्या जंगलात सोडल्याचे सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी सांगितले.