जागृत स्वयंभू ; गिरणेच्या पाण्याने अर्ध नारेश्वर महादेवाला अभिषेक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कावड यात्रा ही भगवान शंकराप्रती असलेल्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. कावडीया आपली कावड खांद्यावर घेऊन पायदळ चालतात आणि त्यात असलेले पवित्र जल शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात. पिंप्राळा परिसरातील जागृत स्वयंभू महादेव, सुख अमृत नगरातील अर्धनारेश्वर महादेव मंदिरावर कावडयात्रेकरूंनी सावखेडा येथून गिरणा नदीतून तांब्याच्या पात्रता पाणी आणून शंकराच्या पिंडीवर ५०० लिटर जल अर्पण केले. सुरुवातीला सावखेडा गिरणा नदीजवळ वाळूची पिंड करून पूजा करण्यात आली. त्यानंतर गिरणा नदीची पूजा, आरती करून महिला भाविकांनी तांब्याच्या पात्रता पाणी भरले. त्यानंतर सुख अमृत नगर, सोनी नगरातील भाविक ‘चल रे कावरीया भरके घगरीया’ गाण्यावर थिरकली.
शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर परिसरातून बुधवारी दुपारी अडीच वाजता कावडयात्रा सावखेडा येथील गिरणा नदी तेथून आपापल्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले. जागृत स्वयंभू महादेव, अर्ध नारेश्वर पिंडीवर ५०० लिटर गंगा जलार्पण करून अभिषेक करण्यात आला. सोनी नगरातील मनोकामना पूर्ती जागृत स्वयंभू महादेव मंदिराचे यंदा दुसरे वर्ष आहे. गंगाजल हे पवित्र मानले जाते. कावड यात्रेदरम्यान ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने वातावरणाची पवित्रता वाढते, असे नरेश बागडे यांनी सांगितले.
सोनी नगर येथून सावखेडा गिरणा नदीचे अंतर जवळपास अडीच किलोमीटर आहे. पुन्हा परत येतांना अडीच किलोमीटर असे ५ किलोमीटर भाविक कावडयात्रेत भर उन्हात पायदळ सहभागी झाले होते. सुख अमृत नगरातील अर्ध नारेश्वर महादेव मंदिर येथील महिला भाविकांनी खांद्यावर, डोक्यावर स्टील कळशीत, तांब्याच्या पात्रात गंगा जल आणून अर्ध नारेश्वर शंकराच्या पिंडीवर अर्पण केले.
७५ वर्षाच्या वयोवृद्धेचाही सहभाग
कावडयात्रा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः श्रावण महिन्यात कावडयात्रा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. ७५ वर्षाची वयोवृद्ध मंगला बारी ह्या आजीबाईने कावड खांद्यावर घेऊन सकाळी ८ वाजता ५ किलोमीटर एकटी पायदळ भर उन्हात चटके सहन करत ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’चा जयघोष करत पिंप्राळा येथील रथ चौकातील महादेव मंदिरात दुपारी ११.३० वाजता शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले.
महिलांनी सजविली कावडयात्रा
सोनी नगरातील कावडयात्रेत महिलांनी कावडयात्रा सजवून खांद्यावर घेत ‘हर हर महादेव’, ‘बोल बम का नारा है, बाबा हमारा सहारा है’ असा जयघोष करुन उन्हातही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व भाविकांनी गंगाजल शंकराच्या पिंडीवर अर्पण केले. त्यानंतर कावडयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसह आशिष सपकाळे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, विलास निकम, श्रीकृष्ण मेंगडे, विनोद निकम, सरदार राजपूत, डॉ. कमोलखी सरकार, पंकज राजपूत, श्यामलता सरकार, अनिता कापुरे, ओमकार जोशी, उदय महाले, मनोज मेंगडे यांच्यासह सुख अमृत नगरातील महिला मंडळानेही परिश्रम घेतले.
