मीटर तोडून जीवे मारण्याची धमकी, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील वावडदा येथील वीज महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी देऊन वीज मीटरची तोडफोड केली. ११ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित वीज ग्राहकावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशा घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर असे की, जळके गावातील एका ग्राहकाने जास्त वीज बिल येत असल्याची तक्रार वावडदा येथील सबस्टेशनला केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी वीज महावितरण कंपनीचे पथक ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता ग्राहकाकडे मीटरची तपासणी करण्यासाठी जळके गावात गेले होते. त्यावेळी जास्त बिल आल्याच्या रागातून संबंधित वीज ग्राहकाने महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात करुन शिवीगाळ केली.
एक तास विद्युत पुरवठा खंडित
अशातच संतप्त ग्राहकाने नुकतेच बसविलेले डीओडी वीज मीटरची तोडफोड करून नुकसान केले. इतकेच नाही तर, त्याने ११ केव्हीच्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनवर लोखंडी सळई फेकून मारत वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण कंपनीने परिसरात सुमारे एक तास विद्युत पुरवठा खंडित केला होता.
