महसूल दिनानिमित्त नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेचे खाते उघडले गेले. त्यामुळे कोणताही शासकीय लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचत आहे. यामुळे महसूल विभागाचे काम अधिक गतीशील झाले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या महसूल कामकाजाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभागाचे कार्य १२४ प्रकारचे आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांना महसूल विभागाची साथ लागते. त्यामुळे हा विभाग सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याचे अधोरेखित करून मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, काही अधिकारी त्यांच्या कामामुळे लोकांच्या कायम स्मरणात राहतात. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जिल्हा प्रशासनाचे खरे ‘कुटुंबनायक’ आहे. त्यांनी प्रभावी प्रशासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १०० व १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता. त्या अनुषंगाने महसूल विभागाने उल्लेखनीय कार्य केले असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
जळगाव जिल्ह्याचे महसूल विभागातील कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे. शासन स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या वापरामुळे कामकाजात गती आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. प्रशासनात फायलींचा ढिगारा, त्यामुळे लागणारे विलंब, सर्वसामान्यांचे चकरा अशा चक्रातून प्रशासन सगळ्या फाईलचे संगणकीकरण झाल्यामुळे फायलींचे प्रचंड मोठे ओझे कमी झाल्यामुळे आता कामे तात्काळ होत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.
महसूल विभागाने वर्षभरात केलेल्या कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालय ही हेरिटेज इमारत आहे. आता तिचे सुशोभीकरण होणार आहे. त्यासाठी पालकमंत्री, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभत आहे. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. राज्याच्या विकासात त्याचे मोठे योगदान आहे. सामान्य माणसांच्या उत्थानासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी महसूल प्रशासनाने सदैव सजग रहावे, असे आवाहन आ.सुरेश भोळे यांनी केले. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी महसूल विजयकुमार ढगे यांनीही वर्षभरातील महसूल विभागाच्या कामांचा आढावा सादर केला.
संकेतस्थळ अद्ययावतासाठी सामंजस्य करार
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नव्या पर्यटन संकेतस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चालना मिळेल. यासोबतच, संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
जमिनी वर्ग सुलभीकरणासाठी नवी प्रणालीचे लोकार्पण
भोगवटा वर्ग २ ते वर्ग १ मध्ये रूपांतर सुलभ होण्यासाठी नवी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. तिचेही लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.