जळगावात जिल्ह्याचा अनुभव असणारे असतील तिघे अधिकारी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम २२ नुसार प्रशासकीय कारणास्तव, रा.पो.से. (राज्य पोलीस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांबाबत आदेश जारी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार जळगावातील एका अधिकाऱ्याची बदली केली आहे. तसेच दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य शासनाने पोलीस उपअधीक्षक, सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र) संवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची भुसावळ शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली केली आहे. जळगाव जिल्ह्यात बाहेरून २ उपअधीक्षक येणार आहे. त्यात चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विजय ठाकुरवाड तर बापू रोहोम यांची मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात काम केले आहे. एकंदरीत जळगावात जिल्ह्याचा अनुभव असलेले तिघे अधिकारी असणार आहेत.



