देशभरातून १६ ट्रेकर्संनी ट्रेकसाठी घेतला सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील ॲड. प्रसाद वसंत ढाके यांनी ‘युथ होस्टेल’तर्फे आयोजित लडाखची राजधानी लेह ते उमलिंगला पास अशा १९ हजार २४ फुट उंचीवरील ३५० किलोमीटर अंतराच्या सायकल ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. उमलिंगला पास हे ठिकाण भारत-चीन सीमारेषेलगत आहे. या ट्रेकसाठी देशभरातून १६ ट्रेकर्संनी सहभाग घेतला होता. ट्रेकचा रस्ता हा लडाखमधील काराकोरम रेंजमधील सिंधू नदीच्या काठाकाठाने आहे. अत्यंत कडाक्याची अंगातील हाडे गोठविणारी थंडी असलेला, अत्यंत खडतर, प्रचंड चढ असलेला, ऑक्सिजन प्रमाण अतिशय अत्यल्प असलेला असा हा रस्ता आहे.
प्रवासात ट्रेकर्संना मध्येच पाउस, मध्येच हिमवर्षाव किंवा हिमवादळं, प्रचंड थंडी अशा अडचणींचा सामना करावा लागला. लेह ते उमलिंगला पास या रस्त्यादरम्यान लांबलांबपर्यंत गवताचे पातेही नजरेस पडत नाही. हा ट्रेक गेल्या २० जुलै २०२५ रोजी सकाळी सुरू होऊन २६ जुलै २०२५ रोजी संपला. अशा सात दिवसांच्या कालावधीत स्पर्धकांना दररोज कमी-जास्त असे ठरवून दिलेले अंतर पार करावयाचे होते. २६ जुलै रोजी शेवटच्या दिवसाचे २४ किलोमीटर हे कच्च्या चिखलयुक्त रस्त्याचे व प्रचंड चढ असलेले अंतर ॲड. प्रसाद ढाके यांनी ४ तास ४० मिनिटात पार केले. समुद्रसपाटीपासून १९ हजार २४ फुट उंचीवर असलेल्या उमलिंगला पास या सगळ्यात उंच ठिकाणी १६ ट्रेकर्सपैकी त्यांनी सर्वप्रथम पोहोचण्याचा मान पटकावला.
न्यायाधीश पदासाठीही झाली निवड
यापूर्वी, त्यांनी जून २०१९ मध्ये युथ होस्टेलतर्फे आयोजित मनाली ते लेह हा ६५० किलोमीटर अंतराचा सायकल ट्रेक सलग ११ दिवस सायकल चालवत पूर्ण केला होता. त्या ट्रेकमध्ये त्यावेळी देशभरातील १०० ट्रेकर्सपैकी फक्त चार ट्रेकर्स लडाखमधील खारदुंगला पास या समुद्र सपाटीपासून १७ हजार ५०० फुट उंचीवर असलेल्या ठिकाणी पोहोचले होते. त्या चार ट्रेकर्समध्ये त्यांचा समावेश होता. त्यांची काही दिवसांपूर्वीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पदासाठीही निवड झाली आहे.