कंजरवाड्यात पसरली शोककळा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील कंजरवाडा भागातील रहिवासी रवींद्र वसंत माछरे यांचा मध्यप्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील आसासौद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी, २८ जुलै रोजी मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे कंजरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे संबंधितांनी सांगितले.
रवींद्र माछरे हे रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांचे सुपुत्र आकाश माछरे यांचे निधन झाले होते. त्यापूर्वी त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला होता. अशा सलग दु:खद घटनांनी कुटुंबाला मानसिकदृष्ट्या मोठा आघात बसला होता. आता स्वतः रवींद्र माछरे यांच्याही आकस्मिक निधनामुळे परिवार पुन्हा दु:खाच्या गर्तेत सापडला आहे.
कंजरभाट समाजातील अनेकांनी व्यक्त केला शोक
रवींद्र माछरे यांचा मृतदेह जळगावात आणण्यासाठी जळगाव येथून विजय बागडे, विजय अभंगे, गोपाल माछरे, निलेश माछरे हे तातडीने सागर (म.प्र.) येथे रवाना झाले असल्याचेही सांगण्यात आले. रवींद्र माछरे हे कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विजय अभंगे यांचे मेहुणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाची वार्ता समजताच समाजातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.



