नागपंचमीनिमित्त विशेष…
जळगावातील सर्पमित्र राजेश सोनवणे यांची घेतलेली मुलाखत
शरद भालेराव/साईमत/जळगाव :
पावसाळ्याच्या दिवसात साप दिसल्यास मारु नये. अशावेळी त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना बोलवावे. तसेच नागरिकांनी सापांना ‘जीवदान’ देऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करावी, अशी माहिती जळगावातील हरीविठ्ठल नगर भागातील व्यंकटेश नगरातील रहिवासी तथा सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी देऊन जनतेला तसे आवाहनही केले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने नागपंचमी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पूर्वसंध्येला भेट घेवून मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते सलूनचा व्यवसाय सांभाळून गेल्या १० वर्षांपासून सापांबद्दल आवड निर्माण करुन त्यांना ‘जीवदान’ देण्याचे कार्य करत आहे. तसेच ही आवड यापुढेही जोपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुलांनाही ते सापांना पकडण्याविषयी प्रशिक्षण देत आहे. त्यातील मोठा मुलगा कुंदन सोनवणे हा विवेकानंद शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. सध्या तोही ‘बिनविषारी’ साप अगदी सहजपणे पकडतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
राजेश सोनवणे पुढे म्हणाले की, पूर्वीपासूनच सर्प क्षेत्रात येण्याची आवड होती. पण त्यासोबत मनात तेवढीच भीतीही होती.पण भीतीपेक्षा माझ्या मनात सर्प जास्त मारले जाऊ नये, त्यासाठी आपण काही तरी जनजागृती केली पाहिजे, असेही नेहमी वाटत होते. कारण बहुतांशवेळा माझ्यासमोर सापाला लोकांनी ज्या निर्दयीपणे मारले होते. ती गोष्ट माझ्या मनाला कायम बोचत होती. म्हणून मी त्यासाठी सर्व गोष्टी बाजूला सारून अगदी परिवाराच्या विरोधाला बाजूला ठेवले आणि ह्या क्षेत्रात जीव धोक्यात घालून उतरलो. आता मला जवळपास १० वर्ष ह्या क्षेत्रात झाली आहे. सर्प पकडायची सुरुवात जरी चुकीच्या पद्धतीने झाली. त्यानंतर मात्र हळूहळू अनुभवातून साप पकडण्याचे ज्ञान अवगत करत गेलो.
काही वर्षानंतर मला जळगावात सापांसह इतर पशु, पक्षी वाचविण्याचे काम वन्यजीव संरक्षण संस्था करते. त्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी वन्यजीव संस्थेत आलो. संस्थेचा सदस्यही झालो. त्यानंतर माझ्या सर्प सेवेला नवी दिशा मिळाली. वन्यजीव संस्थेमुळे वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन मिळाले. माझ्या कामाला नवी दिशा मिळाली. आता तर सापाला हात न लावता कसे पकडायचे, अश्या भरपूर पद्धती आत्मसात केल्या आहेत. त्यासाठी मी नेहमी ‘हुक स्टिक पाईप’चा न चुकता वापर करतो. त्यामुळे सुरक्षित पद्धतीने साप पकडतो. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे वन विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जंगलात सोडतो, असेही त्यांनी सांगितले.
आजीसह तिच्या दोन नातवंडांच्या अंगावर साप फिरकल्याचा अनुभव ठरला भयावह…!
ह्या कामात मला अनेक थरारक अनुभव आले. पण त्यातील एक अनुभव आणि प्रसंग खूपच भयावह सांगण्यासारखा आहे. तोही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, मी एके ठिकाणी साप पकडायला मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास गेलो होतो. तिथे अक्षरशः मन्यार जातीचा ‘अतिविषारी’ साप एका आजीसह तिच्या दोन नातवंडांच्या अंगावर फिरकत होता. जेव्हा आजीच्या हे लक्षात आले तेव्हा तिने साप हाताने पटकन बाजूला फेकला. नशीब त्यांना तो चावला नाही. अन्यथा, मोठा अनर्थही घडला असता. मी तिथे गेलो साप पकडला आणि आजीसह तिच्या दोन नातवंडांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, असेही त्यांनी सांगितले.
साप मानवाचा ‘शत्रू’ नव्हे तर ‘मित्रच’
ह्या क्षेत्रात येऊन मी एक गोष्ट अनुभवली की, आपण जोपर्यंत सापाची मर्यादा ओलांडत नाही, तोपर्यंत साप आपल्याला चावत नाही. त्यामुळे सापांविषयी आजही काही अंधश्रध्दा, समज-गैरसमज रुढ आहेत. तसेच चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या प्रसंग आणि दृश्यांचाही समाजमनावर प्रभाव पडला आहे. त्यात सापांविषयी भासविले जाणारे चित्र सर्व खोटे आहेत. कारण, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी जसे झाड, पशु, पक्ष्यांची गरज आहे. तशीच गरज सापाचीही आहे. साप हा मानवाचा ‘शत्रू’ नसुन ‘मित्रच’ आहे. त्याचे कारण शेतातील मिळणाऱ्या १०० टक्के धान्यांपैकी जवळपास २५ ते ३० टक्के धान्याची नासाडी उंदीर करतात. त्या उंदरांवर नैसर्गिकरित्या ‘कंट्रोल’ ठेवण्याचे काम साप करतो.
घाबरुन न जाता सर्पमित्रांशी संपर्क साधावा
मानवाला होणाऱ्या गंभीर आजारांसाठीही सापांच्या विषाचा औषधीसाठी उपयोग होतो. असे एक ना अनेक फायदे सापापासून मानवाला मिळतात. सापाचे विष हे त्याला त्यांचे अन्न पचविण्यासाठी आणि शिकार केलेले भक्ष्य पचविण्यासाठी असते. साप स्वतःहून कधीच चावा घेत नाही. चुकून आपला हात, पाय त्याच्यावर पडला. तेव्हाच तो आपल्याला चावतो. तसेच सर्वच साप काही ‘विषारी’ नसतात. केवळ नाग, मन्यार, घोणस, फुरसे ह्या चारच जाती विषारी आहेत. साप आपल्या घरात आपल्याला चावण्यासाठी येत नाही तर तो भक्ष्याच्या शोधासाठी येतो. चुकूनही असा प्रसंग कुणावर ओढावल्यास घाबरून न जाता अशावेळी सुरक्षित अंतर ठेवून सर्पमित्रांशी संपर्क साधून सापाला वाचवावे, असेही सर्पमित्र राजेश सोनवणे (मो.क्र.८३०८७८८१८४) यांनी आवर्जून सांगितले.
            


