श्री स्वामी समर्थांच्या पादुका नऊ वर्षांनंतर जिल्ह्यात दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील रामेश्वर कॉलनीतील येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा केंद्रात रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या पादुकांच्या पूजनासह पालखी सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या २०१६ नंतर पुन्हा नऊ वर्षांनी शहरातील प्रतापनगर, आनंदनगर, बिबानगर, कानळदा, अयोध्यानगर अशा विविध केंद्रामध्ये ११ जुलैपासून महाराजांच्या पादुकांच्या पूजनासह पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांसह मूर्ती रथाचे आगमन झाले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या पूजनाचा विधी करण्यात आला. त्यानंतर विविध धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर पादूका रथात ठेवण्यात आल्या. संपूर्ण परिसरात पालखी मिरवणुकही काढण्यात आली होती.
भाविकांनी पादुकांवर केला धान्याभिषेक
जागोजागी भर पावसातही भाविकांनी घरासमोर रांगोळीसह सजावट केली होती. ढोल ताशांच्या गजरात पालखी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा केंद्रात आणण्यात आली. तसेच सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्या पादुकांवर भाविकांतर्फे धान्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासाठी १२४ भाविकांची उपस्थिती लाभली होती. यशस्वीतेसाठी परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.



