संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने जळगाव येथील मान्यताप्राप्त नामांकित समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेतर्फे येत्या १३ ते १५ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवशीय अ. भा. ‘आंतरभारती’ साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड केली आहे. तसेच नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका प्रा. विजया मारोतकर संमेलनाच्या स्वागताध्यक्षा असतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होणाऱ्या साहित्य संमेलनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच नामांकित साहित्यिक सहभाग असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अभिरुची निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासाठी साहित्यिकांना कुठेही जाण्याची किंवा प्रवास करण्याची गरज नाही.
गेल्या १० वर्षांपासून जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान साहित्य चळवळ व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवित आहे. संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संमेलनाला साहित्यिक नामदेव कोळी, मुंबई तसेच प्रा. गोपीचंद धनगर, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासाठी येत्या १० ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
संपर्क साधण्याचे आयोजकांनी केले आवाहन
संमेलनात बालकुमार साहित्यिक सहभागात अभिवाचन, मी वाचलेले पुस्तक, बालकवी संमेलन तर इतर साहित्यिक सहभागात मी लिहिलेले पुस्तक, मी कसा घडलो…, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, देशभक्ती गीतगायन यांचा समावेश असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.सहभाग घेण्यासाठी आर. डी. कोळी (जळगाव- ९८६०७०५१०८), प्रा. गोपीचंद धनगर (जळगाव-९७६६२०७५७४), प्रदीप हेमके (चंद्रपूर- ८२०८३२२७२९), चक्रनारायण किशोर (अहिल्यानगर-९३२५५५८३०५), प्रा.रत्नाकर कोळी, (यावल-८३२९६४६५०५) यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.



