Ganeshotsav Mandals : उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

0
18

प्रथम विजेत्या मंडळाला ५ लाखांसह पारितोषिक, प्रमाणपत्र मिळणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळास तब्बल ५ लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी राज्यभरातील नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. स्पर्धा पूर्णतः निःशुल्क आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धेत मंडळांनी राबविलेले सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरणपूरक सजावट व मूर्ती, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, ध्वनी प्रदूषणविरोधी उपाययोजना, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे संवर्धन इत्यादी विविध निकषांवर परीक्षण केले जाणार आहे. गणेशोत्सव काळात २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयांनी नियुक्त केलेल्या समित्यांमार्फत जिल्हास्तरावरील परीक्षण करण्यात येईल.

राज्यस्तरीय परीक्षणासाठी ४४ मंडळांची शिफारस

मुंबई, उपनगर, ठाणे व पुणे जिल्ह्यातून प्रत्येकी ३ तर उर्वरित ३२ जिल्ह्यातून प्रत्येकी १ अशा ४४ मंडळांची शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी केली जाईल. राज्य स्तरावरील अंतिम विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यात प्रथम क्रमांक ५ लाखांसह प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक अडीच लाखांसह प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक १ लाखांसह प्रमाणपत्र, इतर जिल्हास्तरीय विजेते २५ हजारांसह प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती आणि अर्जाची लिंक संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमध्येही उपलब्ध असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here